फोर्ट लॉडेरडेल – अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन व कायरन पोलार्डच्या समावेशामुळे भारताविरुद्धचे टी-20 सामने रंगतदार होतील असा आत्मविश्वास वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक फ्लॉईड रीफर यांनी व्यक्त केला. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी होणार आहे.
वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंनी या सामन्यासाठी गेले दोन दिवस भरपूर सराव केला आहे. येथील वातावरणाशी समरस होण्यावरही त्यांनी भर दिला आहे. रीफर यांनी सांगितले की, येथे खूपच उन्हाळा आहे व या वातावरणात कोणती रणनीती वापरायची याचे आम्ही नियोजन करीत आहोत. संघातील सर्वच खेळाडू येथील खेळपट्टी व वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताला पराभूत करण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडू उत्सुक झाला आहे.
रीफर पुढे म्हणाले की, आमच्या संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधला गेला आहे. या परिसरात क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठीच आमचे सामने ठेवण्यात आले आहेत. नरेन व पोलार्ड यांना आयपीएल सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. संघासाठी चांगली कामगिरी करतानाच चाहत्यांचे मनोरंजन कसे करता येते याची शैली त्यांच्याकडे निश्चित आहे. नरेन हा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असून फलंदाजीत कोणत्याही स्थानावर खेळण्याबाबत तो ख्यातनाम आहे. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून त्याचा नावलौकिक आहे.
कर्णधार कार्लोस ब्रेथवेटबाबत रीफर म्हणाले की, विश्वचषक स्पर्धेत जरी आमच्या संघास साखळी गटातच पराभव स्वीकारावा लागला असला तरी कर्णधार म्हणून त्याची कामगिरी समाधानकारक झाली होती. त्यामुळेच पुन्हा त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ अतिशय बलाढ्य मानला जात आहे. तरीही आम्ही त्यांना शेवटपर्यंत जिद्दीने लढत देणार आहोत.
संघातील युवा खेळाडूंबाबत रीफर म्हणाले की, डावखुरा फिरकी गोलंदाज खॅरी पिअरीकडून मला मोठ्या आशा आहेत. त्याने गतवर्षी भारताविरुद्ध सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे यष्टीरक्षक अँथोनी ब्रॅम्बेलवरही माझी भिस्त आहे. त्याने येथील स्थानिक सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण चमक दाखविली आहे. त्याने आमच्या “ब’ संघाकडूनही काही आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.