नवी दिल्ली – ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसन याने धक्कादायक निर्णय जाहिर करताना पुढील वर्षी होत असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतली आहे. तब्बल पाच वेळा कार्लसनने ही स्पर्धा जिंकली असून सहावे विक्रमी विजेतेपद पुन्हा एकदा त्याच्यापासून दूरच राहणार आहे.
मला आता काही मिळवायचे नाही. याबाबत मी माझ्या संघाशी, जागतिक बुद्धिबळ महासंघाशीही याबाबत चर्चा केली आहे. जागतिक बुद्धबळ स्पर्धेत मी खेळणार नाही, असे त्याने म्हटले आहे. मात्र, या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी इतक्यात निवृत्तीचा विचार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
31 वर्षीय कार्लसनने डिसेंबर 2021 मध्ये दुबईमध्ये नेपोम्नियाच्ची विरुद्ध 7.5-3.5 असा विजय मिळवून पाचव्यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.
दरम्यान, नेपोम्नियाच्चीने माद्रिदमधील कॅण्डिडेट्स स्पर्धा जिंकत जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची पात्रता मिळवली. त्यामुळे 2023 साली या दोघांचा सामना होणार होता. मात्र, कार्लसनने माघार घेतली असल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.