‘जीपीएस’मुळे पोलीस मदत होणार आणखी जलद

पिंपरी – शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला की नागरिक त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाशी 100 नंबरवर संपर्क साधतात. मात्र घटनास्थळापासून जवळचे पोलीस वाहन कोणते हे नियंत्रण कक्षाला माहिती नसते. यामुळे अनेकदा पोलिसांना घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो. आता हाच विलंब टाळण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर जीपीएस ही यंत्रणा बसविण्याबाबत पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई चाचपणी करीत आहेत. जीपीएसमुळे नागरिकांना पोलिसांची मदत आणखी जलदगतीने मिळणार आहे.

पोलिसांची वाहने आपल्या हद्दीत गस्त घालत असतात. एखादी घटना घडल्यास नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करतात. मग नियंत्रण कक्ष संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्ती वाहनास घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश देतात. अनेकदा पोलीसांचे वाहन हद्दीच्या एका टोकाला असते तर घटनास्थळ दुसऱ्या टोकाला. यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो. नेमका हाच विलंब टाळण्यासाठी जीपीएस यंत्रणा महत्वपूर्ण ठरणार आहे.

एखाद्या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास मिळाल्यावर त्या घटनास्थळापासून कोणत्या पोलीस ठाण्याचे वाहन जवळ आहे याची माहिती जीपीएस यंत्रणेद्वारे मिळणार आहे. नियंत्रण कक्षाचे आदेश मिळताच संबंधित वाहन कोणताही हद्दीचा वाद न घालता घटनास्थळी दाखल होणार आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे वाहनही घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही करतील. मात्र नागरिकांना जलदगतीने पोलिसांची मदत यामुळे मिळणार आहे.

नवीन आयुक्‍तालय स्थापन झाले तेव्हा पोलिसांकडे अवघी 42 वाहने होती. यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोचण्यास उशीर होत होता. यामुळे माजी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी नागरिकांना जलदगतीने प्रतिसाद मिळावा, यासाठी हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी टीम ठेवल्या होत्या. नागरिकांनी मदत मागितल्यावर या टीम घटनास्थळी दाखल होत होत्या. ठिकठिकाणी थांबल्यामुळे यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची निर्गती होत नसल्याचे कारण पुढे आल्याने ही योजना अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही.

पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी पदभार स्विकारल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला. गुन्हे होऊ नये तसेच झाल्यास त्याची उकल त्वरीत व्हावी, यासाठी ठिकठिकाणी लोकसहभागातून सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, असे आयुक्‍तांनी केले. त्यानुसार पोलीस याची अमलबजावणी करताना दिसत आहेत. राज्यातील मुंबई पोलीस दल हे सर्वात अत्याधुनिक समजले जाते. मुंबई पोलिसांच्या बहूतांश वाहनांना जीपीएस ही यंत्रणा बसविली आहे. यामुळे जवळच्या पोलीस वाहनांना त्वरीत मदतीसाठी पाठविले जाते. जीपीएस बसविण्यासाठी मोठा खर्च येत नाही. यामुळे मुंबईच्या धर्तीवर अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरात प्रयोग करता येईल का, याची चाचपणी पोलीस आयुक्‍त घेत आहे.

तातडीच्या वेळी पोलीस मदत वेळेत मिळाली तर पुढील अनुचित घटना टाळता येते. जीपीएस यंत्रणेमुळे पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम अत्यंत जलद होणार आहे. मुंबईच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयात हा उपक्रम राबवण्यात विचाराधीन आहे. तसेच आगामी काळात आयुक्तालयात जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त

Leave A Reply

Your email address will not be published.