मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यपाल आणि शिवसेना यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला होता. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपालांवर टीका करणारे संजय राऊत भेटीला पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या भेटीमागील नेमकं कारण समजू शकले नसले तरी संजय राऊत यांनी ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगितले आहे.
राज्यपाल आमचे मार्गदर्शक असून ही एक सदिच्छा भेट होती. राज्यपाल यांच्याशी जुने संबंध आहेत असं संजय राऊत यांनी भेट झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यपाल अचानक प्रिय कसे झाले असे विचारले असता, राज्यपाल प्रियच असतात, ते राज्याचे पालक असतात असे त्यांनी म्हटले.
राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या काही खूप दिवसांपासून आमची भेट राहिली होती. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंधही अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध जसे पिता-पुत्राचे असतात तसेच आहेत ते तसेच राहतील. आमच्यात कोणतीही दरी नाही, असे संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली असून परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसताना केलेल्या हस्तक्षेपाबाबत उच्चशिक्षणमंत्र्यांना समज द्यावी, असेही कोश्यारी म्हटले आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, उदय समामंत यांचं निवेदन वाचलं. त्यांनी मत व्यक्त केले आहे, निर्णय घेतलेला नाही. राज्यपाला कुलपती असल्याने त्यांनी आपली भूमिका मांडली. राज्यपला सांगतील त्याप्रमाणे संबंधित मंत्री निर्णय घेतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.