टाकळी हाजी -शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड 19 अंतर्गत आपत्ती निवारणासाठी रेशनिंग दुकान, हॉटेलमध्ये सर्व्हे काम, चेक पोस्टिंग त्याचप्रमाणे मजुरांना ने- आण करण्यासाठी नेमणुका केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी अडचणी येत आहे. आपत्ती निवारण कामातून शिक्षकांना मुक्त करा, अशी मागणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडून होत आहे.
आपत्ती निवारण कामामध्ये काही शिक्षक पुण्याला कामगार घेऊन सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी परत येताना त्यांना बस घेऊन जाण्यासाठी झगडावे लागले, अशी प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त केली. सध्या शिक्षक बहुतांशी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करीत आहेत. याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. सर्वेक्षण करीत असताना शिक्षकांकडे कोणती साधने नसतात.
केवळ माहितीच्या आधारे त्यांना सर्वेक्षण द्यावे लागते. परंतु अनेक ठिकाणी शिक्षकांच्या जागृतीमुळे रुग्ण सापडल्याचा अनुभव येत आहे. तरीही शिक्षकांना दोनवेळा आदेश आलेले आहेत. या कामातून शिक्षकांना मुक्त करावे. त्यांना त्यांच्या शिक्षणाचे काम अखंडपणे करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्य नेते सुरेश सातपुते व जिल्हा नेते माऊली पुंडे, लहू शितोळे यांनी केली आहे.
शिक्षकांनी काम करताना संरक्षक किट वापरणे गरजेचे आहे. किट मागणी केल्यास आवश्यकतेनुसार पुरवठा केला जाईल.
-श्रीशैल वट्टे, नायब तहसीलदार, शिरूर.
शिक्षकांच्या नेमणुका करीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे होते. त्यांना प्रशिक्षण नसताना व कोणतेही संरक्षक साहित्य नसताना ते काम करतात. त्यांना किट देणे गरजेचे होते. परंतु शिक्षकांनी स्वतःच्या पैशांनी स्वतःचे मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. या कामातून शिक्षकांना मुक्त करा.
-संतोष थोपटे, अध्यक्ष तालुका प्राथमिक शिक्षक संघ, शिरूर.