सोलापूर – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अनेकदा ते शरद पवारांवर विविध मुद्यांवरून टीका करतात. मात्र यावेळी पडळकरांची जीभ घसरली. टीका करताना पडळकरांनी शरद पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. सोलापुरातील मंद्रूप येथील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.
पडळकर म्हणाले की, “गेल्यावर्षी शरद पवारांनी चौंडीत जाऊन अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यंदा शरद पवार का आले नाहीत? ते चार वेळा मुख्यमंत्री होते, 12 वर्ष केंद्रात मंत्री होते. 1999 पासून राज्यात त्यांचे सरकार होते. तेव्हा एकदाही ते आले नव्हते. गेल्यावर्षी चौंडी त्यांना आपल्या हातातून काढून घ्यायची होती”, असे म्हणत त्यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. यावेळी पडळकरांनी परिवर्तनाचे केंद्र जागरूक ठेवले पाहिजे, असे आवाहन नागरिकांना केले.
यावेळी पडळकरांनी जेजुरी संस्थांनावरील अहिल्यादेवींच्या पुतळ्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी होळकरांची असून ते मंदिर होळकरांनी बांधले. एका वृत्तपत्रात अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे पाहणी करताना शरद पवारांचा फोटो पाहिला. त्यानंतर 15 दिवसांनीच शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण होणार, त्यांचा संबंध काय, कारण आम्ही काहीतरी करतोय हे पवारांना दाखवायचे होते. म्हणून आम्ही तो प्रकार हाणून पाडला. त्यांना चौंडीतही तेच करायचे होते.”
रोहित पवारांवर हल्लाबोल
रोहित पवार हे चौंडीच्या कार्यक्रमात प्रसाद वाटत होतो, असं सांगतात. पण धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात, हे तुला माहिती नाही का माकडा? धनगर समाज काय उपाशी आहे, जो तुम्ही प्रसाद वाटताय. धनगरांच्या घरी पाहुणे आले तरी कोंबड कापतात,’ असे म्हणत पडळकर यांनी रोहित पवार यांचा ‘माकड’ असा उल्लेख केला.