मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये सामावून घ्या, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संपाला भाजपने देखील जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत संपात सामील झाले आहेत. त्यातच आता पडळकरांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. मात्र यावेळी त्यांनी स्वपक्षातील बड्या नेत्यांच नाव घेतल आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक फेसबुक पोस्ट करत आतापर्यंत लालपरीला लुटणारे लुटारू कोण असे म्हणत काही माहिती दिली. मात्र हे करत असताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यानंतर त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली आहे.
‘लालपरीला लुटणारे लुटारू कोण? अशा आशयाची पोस्ट गोपीचंद पडळकर यांनी केले होती. यात त्यांनी आजपर्यंत जे जे परिवहन मंत्री होऊन गेले त्यांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला आहे. हे सांगत असताना त्यांनी तत्कालीन शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे.
दरम्यान हे सांगत असताना त्यांनी या यादीत भाजपमध्ये असलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचाही समावेश केला. विखे पाटील भाजपमधील बडे नेते मानले जातात. मात्र त्यांचच नाव पडळकरांनी लुटारुच्या यादीत टाकलं. विखे पाटील याआधी काँग्रेसमध्ये होते. मात्र आपली चूक लक्षात येताच पडळकरांनी आपली पोस्ट डिलीट केली.