पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोणीकंद परिसरातील न्यू प्यासा बारमधील एका कर्मचाऱ्यासह चालकाने लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर हॉटेल चालकाने एक व्हिडिओ जारी करत महिला पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.
याबाबत पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. तर सत्यराम गावडे (३४) आणि राम गजमल (३१,रा. उबाळेनगर, वाघोली) यांच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी साडेपाचच्या सुमारास लोणीकंद पोलीस स्टेशन मेन गेटचे समोर घडली.
उबाळेनगर येथील न्यू प्यासा हॉटेलवर पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे यांनी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने कामगार राम गजमल यांच्यावर खटला भरुन कारवाई केली होती. याचा राग मनात धरुन गजमल आणि हॉटेल चालक गावडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान, हॉटेल चालकाने व्हिडिओ जारी करत म्हटले की, “माझा बार मान्यताप्रप्त आहे. मात्र तो सुरू ठेवण्यासाठी ढाकणे यांनी दरमहा दहा हजारांची मागणी केली. याला कंटाळून मी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मी कर्जबाजारी असून वडील आजारी आहेत. ढाकणे मॅडमने महिनाभर हॉटेल बंद ठेवण्याचा दम दिला होता. यामुळे टोकाचे पाऊल उचलले.’
पोलीस उपायुक्तांकडून चौकशी
पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न करत तरुणाने गंभीर आरोपी केल्यानंतर वरिष्ठांनी याची दखल घेतली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर यांना दिले आहेत. मंगळवारी त्यांनी दिवसभर माहिती घेतली. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे जबाब घेतल्याचे समजते.