बेंगळुरू – इस्त्रोने सोडलेले चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ पोहचले आहे. या यानाच्या संबंधातील एक महत्वाचे तांत्रिक कार्य पार पडले असून यानाने आता चंद्रा भोवतीची जवळची गोलाकार कक्षा गाठली आहे. देशाची महत्त्वाकांक्षी तिसरी चंद्र मोहीम, 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत दाखल झाली होती,
त्यानंतर 6 आणि 9 ऑगस्ट रोजी अंतराळ यानाने चंद्रा भोवतीच्या आणखी दोन कक्षा ओलांडल्या. आज करण्यात आलेल्या एका तांत्रिक कार्यातून हे यान 150 किमी x 177 किमीच्या कक्षेत पोहचले आहे असे, इस्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे. यानावरील पुढचे तांत्रिक ऑपरेशन 16 ऑगस्ट रोजी सकाळी 08.30 च्या सुमारास नियोजित आहे, असे इस्त्रोने म्हटले आहे.
हे मिशन जसजसे पुढे जात आहे, तसतसे चांद्रयान-3 ची कक्षा हळूहळू कमी होत असून ते चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ जात आहे. हे यान प्रत्यक्ष चंद्रभुमीवर उतरवण्यासाठी इस्त्रोच्या नियंत्रण कक्षातून अनेक तांत्रिक कार्ये केली जाणार आहेत.
इस्रोच्या सूत्रांनुसार, 16 ऑगस्ट रोजी अंतराळ यान चंद्रपासूनच्या 100 किमीच्या कक्षेत पोहोचण्यासाठी महत्वाचा टप्पा कार पाडला जाईल, त्यानंतर लॅंडर आणि रोव्हरचा समावेश असलेले लॅंडिंग मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूलपासून दूर जाईल.
यानातील लॅंडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरणे अपेक्षित आहे. हे एक महत्वाचे नाजूक तांत्रिक कार्य आहे. ते बिनचुक पार पडावे यासाठी इस्त्रोच्या नियंत्रण कक्षातील तज्ज्ञ सज्ज झाले आहेत.