सातारा जिल्हा विविध क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहे. राज्यातच नव्हे तर देशातही नावलौकिक केला आहे. भौगोलिक दृष्टीने उद्योग क्षेत्र, व्यवसायाला पूरक असलेल्या या जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय, सेवा उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचाच भाग म्हणून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राच्या वतीने गुरुवार, दि. 18 व शुक्रवार, दि. 19 रोजी ऑनलाइन पद्धतीने रोजगार मेळावा होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या मेळाव्यानिमित्त घेतलेला जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाचा लेखाजोखा…
करोनाच्या संकटात केंद्र शासनाला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करावे लागले. महाराष्ट्र शासनानेही लॉकडाऊन वेळोवेळी वाढविले. याचा सर्वाधिक फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि उद्योगांना बसला. देशात लाखो उद्योग बंद झाले. सातारा जिल्ह्यातही हजारो उद्योग बंद झाले. टाळेबंदीपूर्वी जिल्ह्यात नोंदणीकृत मोठ्या, मध्यम आणि लघुउद्योगांची संख्या 20 हजार 432 होती. मार्चअखेरपर्यंत ही संख्या कमी होऊन अत्यावश्यक असलेले 188 उद्योगच सुरू राहिले. जिल्ह्यात 20 एप्रिलपर्यंत उद्योगांमधील केवळ सहा हजार 609 कर्मचारी कामावर राहिले.
अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने 20 एप्रिलनंतर उद्योगांना मुभा दिली. काही योजनादेखील जाहीर केल्या. त्याचे सकारात्मक परिणाम झाले. एप्रिलच्या पंधरवड्यापर्यंत सुरू असलेल्या 188 उद्योगांमध्ये मेअखेर आणखी 800 उद्योगांची भर पडली. आणखी सात हजार 745 कर्मचारी पुन्हा कामावर आले. जूनमध्ये 14 हजार 354 कर्मचारी पुन्हा कामावर परतले. जिल्ह्यातील उद्योग अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत.
उद्योगांची घडी पुन्हा बसवण्यासाठी स्थानिक युवक व उद्योजकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. तंत्रज्ञान, खाद्यनिर्मिती, शेती आदींशी संबंधित क्षेत्रातील आणखी उद्योग पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक उद्योगच सुरू होते. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात अन्य उद्योग पुन्हा सुरू झाले. आता जिल्ह्यातील औद्योगिक स्थिती पूर्वपदावर येत असली तरी मनुष्यबळाची कमतरता आहे. स्थलांतरीत मजुरांच्या जाण्याने निर्माण झालेल्या जागांवर भूमिपुत्रांना संधी मिळणार आहे. त्यासाठी नोकरी मेळावा व भरती प्रक्रिया जिल्ह्यात सुरू होत आहे. उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्यावर भर दिला जात आहे.
– संदीप रोकडे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा.