नवी दिल्ली- फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविण्याचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. जागतिक बाजारात डॉलरच्या दरात घट होऊन अमेरिकन रोख्यांवरील परतावा कमी झाला आहे. त्या प्रमाणात सोने आणि चांदीचे दर वाढले असल्याचे दिसून येते.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 398 रुपयांनी वाढून 47,762 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर तब्बल 1,033 रुपयांनी उसळुन 61,147 रुपये प्रति किलो झाला. महागाई पासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकदार आता सोन्याकडे वळू लागले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,808 डॉलर व चांदीचा दर 22.62 डॉलर प्रति औंस झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. आगामी काळात सोन्याच्या दरात उत्तरोत्तर वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांकडून सूचित केली जात आहे.