मुंबई – अमेरिकेच्या व्याज दरवाढीच्या वेळापत्रकामुळे रुपयाच्या किमतीवर दबाव येत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत असली तरी इतर सर्व क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकांत मोठी घट झाली.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्रीचा मारा वाढला असून काल या गुंतवणकूदारांनी 1,468 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 889 अंकांनी कोसळून 57,011 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 263 अंकांनी म्हणजे 1.53 टक्क्यानी कोसळून 16,985 अंकांवर बंद झाला.
इंडसइंड बॅंकेचा शेअर पाच टक्क्यांनी कोसळला. कोटक बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, बजाज फिन्सर्व, एचडीएफसी या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. इन्फोसिस,एचसीएल टेक्, टिसीएस, पावर ग्रिड या कंपनीच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली.
अमेरिकेचे शेअर बाजार विक्रमी पातळीवर असले तरी चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. यामुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री झाली.
दिवस माहीती तंत्रज्ञान कंपन्यांचे
अमेरीकेने व्याजदराचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तर ब्रिटननने व्याजदरात वाढ केली आहे. याचा रुपयाच्या मुल्यावर परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे माहीती तंत्रज्ञान कंपन्यासह निर्यात करणाऱ्या कंपन्या आगामी काळात तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यता येत आहे. या आठवड्यात निफ्टीचे बरेचे नुकसान होऊन निफ्टी आता 17 हजार अंकांच्या खाली आला आहे. आता निफ्टीला 16,780 अंकांवर आधार आहे. जर खरेदी वाढली तर सध्याच्या परिस्थितीत निफ्टी 17,400 अंकांपर्यंत वाढू शकतो, असे शेअर खानचे संशोधन प्रमुख गौरव रत्नपारखी म्हणाले.