मुंबई – या दिवाळीत सोने खरेदी तब्बल 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता बहुतांश ज्वेलर्सनी व्यक्त केली आहे. करोनाचे निर्बंध समाप्त होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेने वेग घेतल्यामुळे ग्राहक आतापर्यंत टाळलेली खरेदी करतील असे ज्वेलर्सना वाटते. गेल्या वर्षी बरीच तयारी करूनही ऐन दिवाळीमध्ये लॉकडाउन सदृश्य परिस्थिती असल्यामुळे सोन्याची अजिबात खरेदी झाली नव्हती. त्यामुळे ज्वेलर्स भयंकर अडचणीत आले होत. मात्र आता परिस्थिती वेगाने सकारात्मक होत आहे.
भारतात पितृपक्ष कालावधीत सोन्याची खरेदी केली जात नाही. मात्र त्यावेळी सोन्याचे दर 42, 500 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर होते. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी या काळातही सोने खरेदी केली असे दागिने उत्पादकाच्या परिषदेचे अध्यक्ष आशिष पेठे यांनी सांगितले.
तीन महिन्यापासून जीएसटीचे संकलन वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत बरीच लग्न टाळली गेली होती. मात्र आगामी लग्नसराईमध्ये मोठ्या प्रमाणात लग्नाचा बार उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोने खरेदी वाढेल असे त्यांनी सांगितले.
या अगोदर सोन्याचे दर 56 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत वाढले होत. आता आर्थिक परिस्थिती सुधारली असतानाच सोन्याचे दर माफक आहेत. जागतिक सुवर्ण परिषदेने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या दागिन्यांची मागणी 58 टक्के वाढली आहेत तर गुंतवणुकीच्या सोन्याची मागणी 18 टक्क्यांनी वाढली आहे. आगामी काळातही मागणी वाढण्याची शक्यता आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ म्हणाले की, नवरात्री पासूनच सोन्याच्या खरेदीने वेग घेतला आहे. चार महिन्यानंतर लग्नसराई येणार असल्यामुळे सोन्याची खरेदी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दिवाळीपेक्षा यावर्षी उलाढाल दुपटीने वाढेल असे बऱ्याच ज्वेलर्सनी सांगितले. गेल्या दीड वर्षांमध्ये परिस्थिती बिघडेल म्हणून इच्छा असतानाही अनेकांनी सोने खरेदी केली नव्हती. हे सर्व लोक पुढील काही आठवड्यामध्ये सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. किंबहुना बऱ्याच ज्वेलर्सना या परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून या ज्वेलर्सनी सोने खरेदी करून ठेवली आहे.