नगर – दिवाळीच्या सुट्ट्यात मोबाईलच्या छंदात वेळ मिळाला तर मुलांना खेळाची आठवण होते. शहर व ग्रामीण भागात हल्ली मुलांना क्रिकेट खेळाने गल्लीपासून ते शहरापर्यंत सर्वांनाच वेडे केले आहे. त्यामुळे लगोरी, सुरपारंब्या, गोट्या, आंधळी कोशिंबीर, कुस्ती, विटी-दांडू, आट्यापाट्या अशा पारंपरिक खेळाकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.
सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहे. त्यातच प्रथमसत्र परीक्षा झाल्याने शाळकरी मुले आनंदी असली तरी दहावी बारावीच्या मुलांना दिवाळीतही अभ्यास करावाच लागणार आहे. अनेकजण दिवाळीचा अभ्यास घेऊन घरी आली आहेत. अध्ययनाबरोबरच मुलांमध्ये मैदानावरील खेळाची गोडी निर्माण होणे सध्या काळाची गरज बनली आहे. शरीराला व्यायामाची गरज आहे.
त्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच सकाळी मॉर्निंग वॉक, योगा करताना दिसत आहेत. परंतु खेळाची मैदाने कमी होत असून मैदाने ओस पडू लागल्याचे दिसतात. दिवाळी व उन्हाळी सुट्टीत मुलांचा मैदानाकडे ओढा जास्त असण्यावजी मोबाईलच्या गेम व रिल्समध्ये लागल्याचे चित्र आहे. सध्या मुले आपल्या पारंपारिक खेळांकडे दुर्लक्ष करून सर्वाधिक क्रिकेट खेळतानाच दिसून येत आहेत.
सुताराकडून बनवलेल्या लाकडी भोवरा, विटी- दांडू सारख्या खेळाच्या वस्तू अलिकडे दिसत नाहीत. खेळांमुळे मुलांना आनंद व शारीरिक व्यायामही होतो. ही खेळांची परंपरा टिकवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.”जुन ते सोनं असतं’ क्रिकेट व मोबाईल गेमच्या जमान्यात जुने पारंपारिक विविध खेळ लोप पावत आहेत. मुलांनाच काय परंतु अनेक पालकांनाहरी पारंपारिक अनेक खेळही माहीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळा, पालकांनीच या पारंपरिक खेळाची माहिती मुलांना समजावून देऊन
ग्रामीण भागातील खेळ
शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये पूर्वी आट्यापाट्या हा मुलांमध्ये व विशेषतः तरुणांमध्ये मोठया प्रमाणात खेळला जात होता. गावात किंवा गावाबाहेरील मोकळ्या जागेमध्ये आट्यापाट्याचे सामने भरविले जात असत. त्यामुळे गावातील तरुण मुले आट्यापाट्या खेळण्यासाठी एकत्रित जमली जायचे. विडी-दांडू, गोट्या, शिवणापाणी, फळी-चेंडूचे डाव रंगायचे, दगड, मातीपासून किल्ले तयार केले जायचे.
पारंपारिक खेळासाठी प्रयत्न गरजेचे
पारंपारिक खेळांकडे मुलांना आकर्षित करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेजमधून पारंपारिक खेळांच्या स्पर्धा भरविल्या जाव्यात, शाळांमधून पारंपारिक खेळासाठी राखीव वेळ, तासाचे नियोजन केले जावे. पारंपारिक खेळांची माहिती व त्यापासून होणाऱ्या फायद्याची पुस्तिका तयार केली जावे, पालकांपासून ते शाळा- महाविद्यालये तसेच राजकीय स्तरातून पारंपारिक खेळ वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.