Gold Rate Today | सोन्याचा दर 8 महिन्याच्या नीचांकी पातळीवर…

सोन्याचे दर कोसळले; चांदीही घसरली

नवी दिल्ली – जागतिक बाजारात डॉलर वधारल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचे प्रतिबिंब भारतातील सोन्याच्या दरावर पडल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या पंधरवड्यात सोन्याचे दर कमी होऊन आता आठ महिन्यांच्या नीचांकावर आले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिल्ली सराफात सोन्याचे दर बुधवारी 717 रुपयांनी कमी होऊन 46,102 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर चांदीचे दर 1,274 रुपयांनी कोसळून 68,239 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,786 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 27.10 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले.

एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक व्यापार आणि व्यवसाय वाढू लागले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर कमी होत होते. त्यातच डॉलर बळकट होत असल्यामुळे बरीच गुंतवणूक तिकडे वळत असल्यामुळे सोन्याचे दर सध्या कमी पातळीवर आहेत.
मात्र आगामी काळात सोन्याचे दर कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करणाऱ्यासाठी व्यवहार फायदेशीर राहील, असे बरेच विश्‍लेषकांना वाटते.

भारतात सोन्याचे दर आता ( Gold Rate in India Today ) विक्रमी पातळीवरून 9,500 रुपयांनी कमी झाले आहेत. अर्थसंकल्पामध्ये सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळेही सोन्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर जून 2020 च्या पातळीवर आहेत.

एक्‍सचेंज ट्रेडेड फंडातूनही सोन्यातील गुंतवणूक काढून घेतली जात असल्याने दिसून येते. अमेरिकेसह विविध देशांच्या सरकारच्या रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे, असे कोटक सिक्‍युरिटीज या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.