Crime | नऊ वर्षीय मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या तरूणास शिक्षा

पुणे – सॅंडल घेऊन देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षाच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 19 वर्षीय तरूणाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. दंड भरल्यास ती रक्कम पीडित मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

अब्दुल रहेमान युनुस सैय्यद (वय 19, रा. पिंपरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलाच्या आजोबाने याबाबत पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. पीडित मुलाची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला.

3 फेब्रुवारी 2013 रोजी पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली. सैय्यद पीडित मुलाला मित्राने कोणत्या दुकानातून सॅंडल घेतला, हे दाखविण्यासाठी घेऊन गेला. त्याला नवीन सॅंडल घेऊन देण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आतील बाजूस असलेल्या खोलीमध्ये नेवून त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य ( Unnatural intercourse ) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ॲड. सुनील हांडे यांनी केली. त्यानुसार भारतीय दंड संहिता 377 (अनैसर्गिक कृत्य) नुसार 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, कलम 342 नुसार 6 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.