पुणे (प्रतिनिधी) – न्यायालयात सुरू असलेला खटला रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करून निकाल बाजूने लावण्यासाठी अडीच लाख रुपये लाच मागून 50 हजार रुपये स्विकारलेल्या महिलेला एक महिन्याने जामीन मिळाला आहे. विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा आदेश दिला. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायाधीशाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय 29, रा. तळेगाव) असे जामीन झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने ॲड. सुधीर शहा, ॲड. सुहास कोल्हे आणि ॲड. राहुल भरेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांचा गुन्हात सहभाग असल्यचे निष्पन्न झाले आहे. 13 जानेवारी रोजी किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली.
वडगाव मावळ तालुक्यातील इंदुरी येथील 32 वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कडजई माता दुध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दुध संकलन करून अमोल डेअरीला घालण्यात येत असत. फिर्यादी आणि भावाच्या विरोधात अमोल डेअरीने केस दाखल केली आहे. तुम्हाला आणि भावाला अटक होणार आहे. ही केस रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करण्याच्या नावावर लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी शुभावरी हिला 14 जानेवारी रोजी अटक केली आहे. तिने न्यायालयीन कोठडीत असताना ॲड. सुधीर शहा, ॲड. सुहास कोल्हे आणि ॲड. राहुल भरेकर यांच्यामार्फत केलेला अर्ज न्यायालयाने मंजुर केला.