नवी दिल्ली – अमेरिकेत व्याजदर कपात होणार असल्यामुळे सोने आणि चांदीची जागतिक पातळीवर जोरदार खरेदी सुरू झाली. अशा परिस्थितीत गुरुवारी जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भारतीय सराफातही त्या तुलनेत सोन्याच्या दरात वाढ झाली. (Gold price at record high)
दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,130 रुपयांनी वाढून 67,450 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात अकराशे रुपयांनी वाढून 77,750 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,202 डॉलर आणि चांदीचा दर 25.21 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
श्लिेषकांनी सांगितले की, डॉलर कमकुवत होत असल्यामुळे आणि अमेरिकेतील कर्जरोख्यावरील परतावा कमी होत असल्यामुळे आता बरीच गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे या दोन धातूचे वायदे बाजारातील दर वाढत आहेत. वायदे बाजारातील दर वाढत असल्यामुळे स्पॉट मार्केटमध्येही सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे सांगण्यात आले.
एलकेपी सिक्युरिटी ज्या संस्थेचे विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, अमेरिकेने तूट कमी करण्याचा पुनरुच्चार केला आहे. डॉलर कमकुवत होऊन सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे आता जागतिक मंदी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका मंदीत जाणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता जगातील विविध बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम सोने आणि चांदी बाजारावरही होत आहे.