वाघोली (प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकी समोर एका व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन स्वतःला संपवले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी निलंबन देखील केले होते.
आगीपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असणारे अग्निशामक यंत्र या पोलीस चौकीत दुर्घटना होऊन देखील बसवले गेले नसल्याने पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या वाघोली केसनंद, पेरणे या तीन ठिकाणी पोलीस चौकीच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. नागरिकांचा पोलिसांकडून न्याय मिळण्यासाठी जीवघेणा प्रवास हद्दीतील नागरिकांचा अजनुही संपलेला नाही.
एक दुर्घटना होऊन देखील पुढची दुर्घटना होऊ नये यासाठी लोणीकंद पोलिसांकडून कोणतीही प्रतिबंधात्मक उपाय योजना केली नसल्याने आगामी काळात अशी दुर्घटना घडली तर त्यास पोलिसांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघोली चौकी अंतर्गत गोरे वस्ती येथे खुल्या व छुप्या पद्धतीने गांजाची विक्री, हॉटेलवर राजरोसपणे दारूची विक्री चालू असून पोलीस आयुक्तांच्या आदेशाला लोणीकंद आणि वाघोली चे पोलीस केराची टोपली दाखवतात का काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
वाघोली मध्ये नुकत्याच वाघोली येथील काळूबाईनगर परिसरामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारावर लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.
मात्र ह्या गुन्ह्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी पान टपरी चालकांकडून हप्ता गोळा करण्यात आला होता. अशी चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पोलिसांचे अवैध धंद्यांना छुपे पाठबळ आहे का काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
…ठराविक कर्मचाऱ्यांची मक्तेदारी
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या चौकी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखनिक म्हणून काही ठराविक कर्मचाऱ्यांची मक्तेदारी असून तेच ठराविक कर्मचारी अनेक वर्षांपासून चौकीचे अंमलदार, पोलीस अधिकाऱ्यांचे रायटर, पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार म्हणून फिक्स आहेत. याच फिक्स कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वारंवार चकरा मारावे लागत आहे हे देखील वास्तव्य आहे.
वाघोली मधील अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या गुटका चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
– चेतन थोरबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस चौकी
वाघोली चौकी समोर झालेल्या दुर्घटनेनंतर चौकीत अग्निशामक यंत्र बसवण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच त्या ठिकाणी यंत्र बसवण्यात येणार आहे.
– कैलास करे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस ठाणे