नवी दिल्ली – चीनमध्ये आर्थिक पेचप्रसंगाच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारले. त्यामुळे भारतातही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
भारतीय सराफात सोन्याचा दर बुधवारी 196 रुपयांनी वाढून 45,746 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 319 रुपयांनी वाढून 59,608 रुपये प्रति किलो झाला. सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव 26 पैशांनी कमी झाला होता.
या घटनाक्रमाबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस चे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, चीनमध्ये एव्हरगॅंडे कंपनीसमोर भांडवल सुलभतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझर्वची दोन दिवस चालणारी बैठक आज संपत आहे. त्यामुळे जागतिक बाजारामध्ये काही प्रमाणात अस्थिरतेचे वातावरण आहे.
अमेरीकेचे पतधोरण जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात सोने आणि इतर बाजारांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,776 डॉलर व चांदीचा दर 22.72 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहीला. आगामी काळात भारतात बरेच उत्सव येणार आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.