Gold Price Today – अनेक देशांदरम्यान राजकीय तणाव निर्माण झाले असतानाच अमेरिका आणि युरोपातील रिझर्व्ह बँका व्याजदरात कपात करण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे मागणी वाढून जागतिक पातळीवर सोन्याचे दर नव्या विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहेत. त्याचे प्रतिबिंब भारतातही पडत असल्याचे वातावरण आहे.
दिल्लीत सोन्याचा दर 160 रुपयानी वाढून 72 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 200 रुपयांनी वाढून 84,700 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. गेल्या तीन दिवसापासून सोने विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहे.
अशा परिस्थितीत नफेखोरी होऊन सोने आणि चांदीचे दर कमी होण्याची शक्यता काही विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी सध्या सावध राहून व्यवहार करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर तब्बल 2,356 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे तर चांदीचा दर 28.10 प्रति औंस या पातळीवर आहे.
वायदे बाजारातही सोन्याचे दर वाढत असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. या आठवड्यात फेडरल रिझर्व्हचे काही अधिकारी व्याख्यान देणार आहेत. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मात्र लवकरच व्याजदर कपात होईल असे बर्याच गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढत आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर 75 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर चांदीचा दरही 85 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो.
सोन्याच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगभरातील गुंतवणूकदार जोखीम कव्हर करू इच्छितात. त्यांना भीती वाटते की युद्धामुळे संकट आणखी वाढू शकते. व्याजदर कपातीनंतर डॉलरच्या संभाव्य कमकुवतपणाबद्दलही ते घाबरले आहेत. जगभरात चांदीचा पुरवठा कमी आहे, तर मागणी वाढत आहे.