मुंबई – अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे पतधोरण लवकरच जाहीर होणार असल्यामुळे भारतासह जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार सावध आहेत. भारतीय शेअर बाजारात दिवसभर अस्थिर वातावरण राहीले. बाजार बंद होताना निर्देशांकात माफक घट नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 77 अंकांनी कमी होऊन 58,927 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 अंकांनी कमी होऊन 17,546 अंकांवर बंद झाला.
चीनमधील आर्थिक पेचप्रसंग नीवळण्याची शक्यता वाढल्यामुळे वाहन, माहिती तंत्रज्ञान, धातू, रिऍल्टी क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली. मात्र बॅंकिंग क्षेत्राकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये घरांची विक्री वाढली असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्या बुधवारी तेजीत होत्या. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप आणि मिड कॅप दीड टक्क्यापर्यंत वाढले.
एचडीएफसी बॅंक, नेस्ले, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 1,041 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.
एव्हरग्रॅंडेचा पेच मिटण्याची चिन्हे
चीनमधील बलाढ्य रियल इस्टेट कंपनी एवरग्रॅंडेसमोर आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ही कंपनी घेतलेल्या कर्जावरील व्याज तरी देऊ शकेल का हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गेल्या आठवड्यात जागतिक शेअर बाजारावर परिणाम झाला होता. मात्र व्याज भरण्यासाठी या कंपनीने काही वित्तीय संस्थांबरोबर करार करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळ चीनसह आशियाई शेअर बाजार सावरले होते. मात्र तरीही या कंपनीतील घडामोडींकडे चीन आणि इतर देशातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. चीनमधील ही कंपनी बुडाली तर अमेरिकेतील लेहमन ब्रदर्ससारखा प्रश्न पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील निर्माण होऊ शकतो असे बोलले जाते.