ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार जुन्नर तालुक्यात वाढले
नारायणगाव (पुणे) -पोलीस असल्याची बतावणी करून जेष्ठ नागरिकाची 35 हजार किमतीची सोन्याची अंगठी लुबाडली. फसवणूक करणाऱ्या एकावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत सबाजी गायकवाड (वय 68, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भागवत गायकवाड हे बुधवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजता जुन्नर कोर्टातून काम उरकून मोटारसायकलवरून नारायणगावकडे जात असताना काळे पेट्रोलपंपाचे थोडे पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक मोटार सायकलस्वार थांबलेला होता. त्याने गायकवाड यांना थांबण्याचा इशारा केला.
गाडी थांबविली असता त्याने “मी पोलीस आहे. अशोक लक्ष्मण शिंदे यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्याच्या कडील दागदागिने काढून घेतलेले आहेत. मला तुमची झडती घ्यायची आहे. तुमचे अंगावर काय दागिने असतील ते काढून दाखवा, असे सांगितले. गायकवाड यांनी खिशातील सर्व वस्तू काढल्या असता तुमच्या हातातील अंगठी काढून द्या, असे सांगितले. सर्व वस्तू रुमालात बांधून हातचलाखी करून तो रुमाल परत गायकवाड यांच्या खिशात ठेवला. काही वेळाने खिशातील रुमाल काढून पाहिला असता त्यात सोन्याची अंगठी नव्हती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले.
- दोन महिन्यांत 12 घटना
पोलीस असल्याची बतावणी करून सध्या जुन्नर तालुक्यात अज्ञात चोरटे हे ज्येष्ठ नागरिकांना हेरून सावज बनवत आहेत. बनावट आयकार्ड दाखवून चोरी झाली आहे, दरोडा पडला आहे, लॉकडाऊन आहे, करोना सुरू आहे, अंगावर सोन्याचे दागिने घालू नका अशी विविध कारणे सांगून दिशाभूल करून बोलण्यात गुंतवून सोने लंपास करण्याचे प्रकार घडत आहेत. नारायणगाव व जुन्नर परिसरात दोन महिन्यांत सुमारे 12 घटना घडल्या आहेत.