लोणावळा नगरपरिषदेचा उपक्रम : कचरा डेपोमधील टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती
फुलपाखरू, पक्षी, गोगलगाय, नांगर, विंचू, मिसाईल, रॉकेट, बंदुका, विमानाची शिल्पकृती
शहरातील सहा ठिकाणी नोव्हेंबर अखेरीस उभारण्याचा मानस
लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेने शहर सुशोभिकरणाकरिता भंगार लोखंडापासून शिल्पनिर्मिती करण्याची शक्कल लढवली असून, धनंजय होन्नगी या स्थानिक अवलिया कलाकाराने त्याला मृत स्वरुप देण्यासाठी कंबर कसली आहे. या कामात प्रमोद खिल्लारे यांची साथ त्यांना मिळत आहे. सध्या लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपोवर भंगार आणि टाकाऊ साहित्यापासून आकर्षक असे फुलपाखरू, पक्षी, गोगलगाई, नांगर, विंचू, ब्रम्होस मिसाईल, रॉकेट, बंदुका, विमाने तयार करण्याचे काम सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शहरातील किमान सहा ठिकाणी या शिल्पाकृती लावण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये उत्तम कामगिरी करीत शहर सुशोभिकरणाच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपोच्या “डम्पिंग ग्राउंड’वर पडून असलेल्या भंगार साहित्यापासून नाविण्यपूर्ण शिल्पाकृती करण्याचा मानस नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व नगरसेवकांनी यांनी व्यक्त केला. शहरातील प्रसिद्ध शिल्पकार असलेले धनंजय होन्नगी यांनी याकरिता निविदा दाखल करत कामाला सुरुवात केली आणि वरसोली कचरा डेपोवर टाकून दिलेले लोखंडी रॉड, पाईप, पत्रा, अँगल, बेअरिंग, लाईट आदी भंगार व टाकाऊ साहित्यापासून कल्पकतेने वेगवेगळ्या शिल्पाकृती आकारात येऊ लागल्या आहेत.
दरवाज्यांच्या कड्यांपासून त्यांनी विमानाची निर्मिती केली, तर टाकाऊ लाईट, लोखंडी रॉड, पाईप, बेअरिंग याचा वापर करुन भव्य स्वरुपातील फुलपाखरू तसेच गोगलगाईची जोडी बनवली आहे. पाण्याचे पाईप व अँगल यांचा वापर करुन ब्रम्होस हे मिसाईल बनविण्याचे काम सुरू असून, फायर फायटर मधील सिलेंडरचा वापर करत लहान मिसाईल तयार करण्यात येत आहे. पाईप आणि पत्रा यांचा वापर करीत राफेल, मिग 21 यासारखी लढाऊ विमान आकार घेत आहेत.
…म्हणून लढाऊ विमान, बंदुका अन् तोफा
यासंदर्भात धनंजय होन्नगी व प्रमोद खिल्लारे म्हणाले की, हे काम सुरू केल्यापासून भंगारामधील वस्तू पहिल्या की आपोआप काही कलाकृती तयार करण्याची कल्पना डोळ्यासमोर येते व त्यामधून या शिल्पांची निर्मिती होत आहे. त्यातही आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांची आठवण आपल्याला सतत राहावी आणि त्यांच्याप्रती आपले प्रेम व्यक्त व्हावे यासाठी लढाऊ विमान, क्षेपणास्त्र, बंदुका, तोफा आदी कलाकृतींची निर्मिती आवर्जून करीत आहोत.
टाकाऊ व भंगार वस्तुंपासून बनविलेल्या या कलाकृती लोणावळा शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर घालणार आहे. अल्पावधीत ही ठिकाणी पर्यटकांचे ठिकाण बनतील. स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून लोणावळा शहरात सातत्याने उपक्रम राबविण्यात आले आहेत. या वर्षीचा उपक्रम हा महाराष्ट्रातील वेगळेपण दाखविणारा व शहर सौंदर्यात भर घालणारा नावीण्यपूर्ण उपक्रम ठरेल, यात शंका नाही.
– सचिन पवार, मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद.