पुणे – पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या बसेस इतिहास (स्क्रॅप) जमा होणार असून आगामी काळात 300 छोट्या (मिनी) आणि 600 मोठ्या असा एकूण 900 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पीएमपीचे संचलन सुरळीत होणार आहे. तसेच इलेक्ट्रिक बसमुळे पीएमपीला होणाऱ्या तोटा कमी होईल, असा विश्वास पीएमपीएमएल प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
स्वारगेट येथील पीएमपीएमएल मुख्यालयाच्या कार्यालयात संचालक मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पीएमपी कर्मचारी, भाडेतत्वावर बससेवा देणारे संबंधित कंपनीचे संचालक (ठेकेदार) आणि एमएनजीएलचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवीन बस खरेदी, जुन्या बस स्क्रॅप करणे, कर्मचाऱ्यांचे सातवे वेतनातील राहिलेला फरक, ठेकेदारांचे प्रश्न यासह विविध विषयांवर चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग, पीएमपीएमएलचे व्यावस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्यासह पीएमपीचे अधिकारी उपस्थित होते.
पुण्यतील मेट्रो सुरू झाल्यावर घर ते मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवाशांना तत्काळ बससेवा मिळण्यासाठी 300 छोट्या (मिनी) इलक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जी.सी.सी. तत्वावर 100 ई-बस आणि 200 सीएनजी बस तसेच केंद्र सरकारकडून 300 इलेक्ट्रिक बस मिळणार असून याबाबतचा पाठपुरवा करण्यात येत आहे.
पीएमआरडीए हातभार लावणार…
पीएमपीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकेकडून दरमहा काही रक्कमेचा हिस्सा पीएमपीला देते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही पीएमपी सेवा देत असून या तोट्यामध्ये पीएमआरडीएनेही हातभार लावला पाहिजे. त्यानुसार पीएमआरडीएचे आयुक्त पीएमपी संचालक मंडळावर असतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पीएमआरडीएकडून पीएमपीला दरवर्षी 200 कोटी मिळणार असून त्यातील 50 कोटी पीएमपीला दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीला हातभार लागल्यासारखे आहे.