पुणे : शहरात ऑल आऊट ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून गुरूवार पेठेतील गौरी आळी येथील भंगार व्यावसायिकावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 1 हजार 105 जिवंत आणि खराब काडतुसे, बुलेट आढळून आल्या.
दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज (रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, मूळ उत्तरप्रदेश) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युनिट 1 चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुरुवार पेठेत भंगार व्यापाऱ्याने बंदुकीची काडतुसे ठेवलेली आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर छापा टाकला असता 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट (लिड) जप्त केली. दरम्यान, आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे व बुलेट कोठून आणल्या? ते कशासाठी बाळगलेले आहे? यापूर्वी त्याने इतर कोणाला काडतुसे दिलेली आहेत काय? याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याला न्यायालयाने 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय जाधव, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, अय्याज दडडीकर, इम्रान शेख, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, शुभम देसाई, नीलेश साबळे यांनी केली आहे. उप निरीक्षक संजय गायकवाड तपास करत आहेत.