प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ताफ्यातील दहा वर्षे जुन्या 84 सीएनजी गाड्या भंगारात (स्क्रॅप) काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे तसेच वांरवार होणाऱ्या ब्रेक डाउनच्या घटना टाळता येणार आहे.
पीएमपीच्या संचलनात 1600 हून अधिक गाड्या आहेत. यातील 1250 गाड्या या सीएनजी आहेत, तर 292 गाड्या इलेक्ट्रीक आहेत. यातील 382 सीएनजी गाड्या सहा वर्षांहून अधिक जुन्या आहेत. तर 900 हून अधिक गाड्या 5 वर्षापर्यंत जुन्या आहेत. मागील काही दिवसांपासून पीएमपी बसच्या ब्रेक डाउनच्या घटनात वाढ झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करवा लागत होता. तसेच या जुन्या गाड्यांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. रोज ब्रेक डाउनच्या घटनांमुळे प्रवाशांना मध्येच गाडी बदलून इच्छितस्थळी प्रवास करावा लागत होता.
ब्रेक डाऊनच्या घटनांमागचे कारण विचारात घेता, पीएमपी प्रशासनाने जुन्या सर्व गाड्यांची तपासणी करून यातील दहा वर्षे जुन्या गाड्या भंगारात टाकण्याचा निर्णय घेतला.