पणजी : गोव्याच्या मावळत्या विधानसभेतील एकूण 40 पैकी निम्म्या म्हणजे 20 आमदारांनी पाच वर्षांत पक्षबदल केला. त्यातून गोव्याचं राजकारण भलतंच असल्याचे सूचित होते. गोव्यातील मागील विधानसभा निवडणुकीत (2017) कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यावेळी सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसला चकवत भाजपने लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर काही काळातच विश्वजित राणे हे पक्षबदल करणारे गोव्यातील पहिले आमदार ठरले.
त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षी (2018) आणखी दोन आमदार कॉंग्रेसचा होत सोडून भाजपमध्ये दाखल झाले. जुलै 2019 मध्ये कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले. त्यावेळी 10 आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर यावेळच्या निवडणुकीआधी गोव्यात आमदारांच्या पक्षबदलाचे आणखी एक सत्र घडले.
मागील निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळच्या निवडणुकीआधी कॉंग्रेसकडे केवळ 2 आमदार उरले होते. छोटेखानी गोव्यात नेहमीच मोठ-मोठ्या राजकीय घडामोडी घडतात. त्यामध्ये पक्षबदल या घटकाचा वाटा मोठा आहे.