पणजी – महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, तीन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. तर काँग्रेसही दहा जागांवर पुढे आहे. मात्र गोव्यात भाजप-काँग्रेस यांच्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. गोव्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असून काही ठिकाणी डिपॉझिटही जप्त होण्याची चिन्हं आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात किती मतं पडली आहेत, हे पाहूया..
मतदारसंघ – उमेदवाराचे नाव – मतं (दुपारी दोन वाजेपर्यंत)
हळदोणा- गोविंद गोवेकर – 342
पर्ये – गुरुदास गावकर – 267
पेडणे- सुभाष केरकर – 223
वाळपई – देवीदास गावकर – 183
शिवोली – करिष्मा फर्नांडिस – 166
म्हापसा – जितेश कामत – 123
मांद्रे – बबली नाईक – 116
साखळी – सागर धारगळकर – 97
केपे – अॅलेक्सी फर्नांडिस – 66
कुडतरी- भक्ती खडपकर – 55
वास्को – मारुती शिरगावकर – 49
कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?
भाजप {33.40%}
काँग्रेस {23.21%}
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष {7.76%}
आप {6.80%}
तृणमूल काँग्रेस {5.23%}
गोवा फॉरवर्ड पक्ष {1.83%}
राष्ट्रवादी {1.09%}
नोटा {1.12%}
शिवसेना {0.18%}
इतर {19.38%}
दरम्यान, सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. शिवसेनेला 0.25 टक्के मतदान होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 0.83 टक्के मिळाली. तर, नोटा पर्यायाला 1.20 टक्के मतदान मिळाले. उत्तर प्रदेशमध्येही शिवसेनेच्या उमेदवारांची सुमार कामगिरी राहिली. शिवसेनेच्या उमेदवारांना 0.02 टक्के मते मिळाली. तर, नोटा पर्यायाला 0.71 टक्के मते मिळाली.
प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सभा घेतल्या. राज्याबाहेर शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभा घेणारे आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले होते.