“जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय”

नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

मुंबई : राज्यात सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल शिवसेना भवना समोर सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. याच प्रकरणावरून आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे यांनी देसखील कार्यकर्त्यांवर टीका करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुनच नितेश राणे यांनी टीका केली आहे.


“जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, “असे ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळाप्रकरणी शिवसेनेच्या चंदू झगड़े, राकेश देशमुख, अभय तमोरेंसह इतर 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे भाजपा युवा मोर्चाच्या तजिंदर सिंह तिवाना (आयोजक), अजित सिंह आणि इतर एकूण 30 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188, 269 IPC, 51 तसेच राष्ट्रीय आपात्कालीन कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडून केला जात आहे.

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळाले . त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.