राजगुरूनगर -शिक्षकांना कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस तात्काळ मिळावा यासाठी शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे विठ्ठल तांबे, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश कांबळे, खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तान्हाजी महाळुंगकर, कार्यालयीन चिटणीस नितीन आडवळे, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किरण तांबे उपस्थित होते. दरम्यान, यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रश्नांबाबत शिक्षक प्रतिनिधींनी आमदार मोहिते पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये करोना कालावधीत अनेक शिक्षक फ्रंटलाइन वकर्स म्हणून काम करीत आहेत;
त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर शिक्षकांसाठी लसीकरणाचा दुसरा डोस काही प्रमाणात राखीव कोटा म्हणून ठेवण्यात यावा. करोना काळात शिक्षक विविध आदेशाअंतर्गत काम करीत आहेत. त्यांना शासनस्तरावरून 50 लाख रुपयांचा विमा कवच मंजूर करावे. शिक्षकांच्या विविध करोना आदेशाबाबत तालुकास्तरावर समन्वय साधून शिक्षकांच्या आदेशात रोटेशन पॉलिसीचा वापर करण्यात यावा.
करोना काळातील विविध आदेशाअंतर्गत काम करताना शिक्षकांना सुरक्षा साधने तालुका पंचायत समिती पातळीवरून पुरविण्यात यावीत, अशी मागणी केली. तर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आमदार मोहिते यांनी सांगितले.