भारत बायोटेकच्या लसीची 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस

नागपूर, दिल्ली आणि पाटण्यात होणार ही चाचणी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या लढाईत आता मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका तज्ज्ञ समितीने मंगळवारीनुकतीच भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस करण्यात आली आहे.

नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसेच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाण ही चाचणी केली जाणार असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचं आकलन करण्यासाठी कोवॅक्सिन डोसच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती भारत बायोटेकने केली होती. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सीडीएससीओच्या कोविड-19 विषयक तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या विनंतीवर विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने प्रस्तावित दुसरे/तिसरे टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करताना आयसीएमआर आणि भारत बायोटेकने म्हटले होते ती, सामान्य कोरोनाबाधित रुग्णांवर कोवॅक्सिन ही लस 78 टक्के प्रभावी आहे. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटेंटविरोधात अँटीबॉडी बनवण्याचं काम भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस करते, असं वृत्त अमेरिकेचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केले होते .

दरम्यान भारत बायोटेकने देशातील विविध राज्यांमध्ये आपल्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा सुरु केला आहे. भारत बायोटेक कंपनीने ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, आसम, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा यात समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.