पिंपरी – रेमडेसिविरचा काळा बाजार करणारे गजाआड

21 इंजेक्‍शन जप्त ः मेडिकल दुकानदार, नर्सिंग स्टाफ, डिलिव्हरी बॉयचा सहभाग

पिंपरी -रेमडेसिविर इंजेक्‍शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका मेडिकल दुकानदाराचाही समावेश आहे. मेडिकल दुकानदार अन्य दोघांना रेमडेसिविर इंजेक्‍शन अधिक किमतीने विकण्यासाठी देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

शशिकांत पांचाळ (रा. जयमल्हार नगर, थेरगाव), कृष्णा पाटील (वय 22, रा. थेरगाव), निखील नेहरकर (वय 19, रा. बिजलीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शशिकांत याचे चिंचवड येथे आयुश्री मेडिकल आहे. आरोपी कृष्णा एका रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे. तर निखिल हा डिलिव्हरी बॉय आहे.

शशिकांत याच्या सांगण्यावरून कृष्णा आणि निखिल हे दोघेजण गरजू रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्‍शन मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत होते. दोन इंजेक्‍शनची डिलिव्हरी घेऊन रविवारी मध्यरात्री पावणेतीन वाजता हे दोघेजण दोन दुचाकीवरून जात होते. काळेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये दोघेजण अडकले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन रेमडेसिविर इंजेक्‍शन मिळून आले.

विक्री परवानाबाबत त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांची चौकशी केली. त्यात ते मेडिकल चालक शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्‍शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे इंजेक्‍शन विकून पांचाळ याला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची (एम एच 14 / डी ए 4881) झडती घेतली असता सीटच्या खाली 19 रेमडेसिविर इंजेक्‍शन सापडले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.