शिक्रापूर -शिरूर तहसील कार्यालयात अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अनेक तक्रारी केल्यानंतर देखील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही.
तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती द्या अन्यथा तहसील कार्यालयाची सत्यनारायण पूजा घालू, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष तेजस यादव व शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
शिरूर तहसीलदार कार्यालयातून अनेक प्रकार घडत आहेत. यामध्ये जनतेची मोठ्या प्रमाणात लूटदेखील होत आहे. तालुक्यातील ओढे-नाल्यांचे अतिक्रमण प्रकरण, करोना काळातील तांदूळ व डाळींचा घोटाळा, गणेगाव खालसा येथील खोटे पंचनामे, मांडवगण फराटा येथील खोटे
आदेश, तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून नागरिकांना पैशाची मागणी, तळेगाव ढमढेरे गोदामातील घोटाळे असे अनेक घोटाळे उघड झालेले आहेत. यामध्ये काही अधिकारी निलंबित झालेले आहेत,
मात्र तहसील कार्यालयातील अनेक प्रश्न तसेच कारवाईच्या मागणी साठी दिलेल्या तक्रारी प्रलंबित असताना अचानकपणे तहसील कार्यालयाला बोकडाचा नैवेद्य दाखविण्यात आल्याची घटना उघडकीस आली.
त्यामुळे या सर्व प्रकाराची तसेच घडलेल्या प्रकारावर केलेल्या कारवाईची मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे. येत्या सात दिवसांमध्ये माहिती दिली नाही तर शिरूर तहसील कार्यालयात सत्यनारायण पूजा घातली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तहसील कार्यालयात नैवैद्य दाखवला असा प्रकार झालेला नसून, हप्ते मागण्यासाठी दबावतंत्र सूरु आहे. चुकीच्या घटना वेळीच शोधून मी कारवाई केली आहे आणि हेच काही ब्लॅकमेलर लोकांना नको आहेत.
-लैला शेख, तहसीलदार शिरूर