मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी १ महिन्याचा अधिकचा वेळ द्यावा, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
विधीमंडळाकडून 5 डिसेंबरला आमदारांना आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली होती. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी अधिकचा कालावधी मागितला. मात्र, शरद पवार गटाने आमदार अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर सादर केले आहे.
शरद पवार गटातील एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरूण लाड यांना विधान परिषद आमदार अपात्रतेबाबत नोटिस देण्यात आली आहे. तर अजित पवार गटात अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, सतीश चव्हाण यांना नोटीस देण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (8 डिसेंबर) विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले होते.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या दाखल केलेल्या याचिकेनंतर या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस काढण्यात आली होती. तर अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही गटांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांमध्ये आपले उत्तर सादर करण्याचा आदेश या नोटीसमधून देण्यात आला होता.
निवडणूक आयोगात सुनावणी सुरू
दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात भूमिका मांडण्यात आली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्रं सादर केल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.