एम.डी.एम.पोर्टलवर नोंद करण्याचे शाळांना आदेश
25 जानेवारीपर्यंत माहिती भरण्याची मुदत
पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना पुरविण्यात येत असलेल्या तांदूळ व धान्य आदी मालाची माहिती अपडेट करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. माहिती अपडेट न केल्यास शाळांमधील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती भरण्याची सुविधाच बंद करण्यात येणार आहे, असा इशारा शालेय पोषण आहार कक्षाचे राज्य समन्वय अधिकारी दिनकर टेमकर यांनी दिला आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्य वाढवी, शाळाबाह्यमुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, शारीरिक तंदुरुस्तीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येत असते. शासनाकडून मिळणारा निधी शाळांना वाटप करण्यात येतो. योजना अधिकाधिक पारदर्शकपणे राबविण्यासाठी शासनाकडून सतत नवीन नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
किराणा साहित्य वापरले, शिल्लकची नोंद…
एम.डी.पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. किराणा साहित्य किती वापरले व किती शिल्लक याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सर्व शाळा नियमितपणे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरतील याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.