सातारा – लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना, सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीचे सदस्य व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची जलमंदिर या निवासस्थानी सोमवारी अचानक भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे 40 मिनिटे कमराबंद चर्चा झाली. उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी महाजन यांनी शिष्टाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा भाजपकडून झालेली नसल्याने, उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास पक्षांतर्गत विरोध असल्याचा आरोप राजे समर्थकांनी काही दिवसांपूर्वी केला होता. उमेदवारीबाबत दोन दिवसांपूर्वी उदयनराजेंना पत्रकारांनी विचारले असता, मी राजकीय संन्यास घेत नाही, असे वक्तव्य करून उदयनराजे यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सुचित केले होते. महाविकास आघाडी, महायुती यांच्याकडून वेगवेगळ्या मतदारसंघांतील उमेदवार जाहीर होत असताना, सातार्यात मात्र कोणत्याच आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन व उदयनराजे भोसले यांच्या भेटीला महत्त्व आहे.
महाजन यांचे सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास जलमंदिर येथे आगमन झाले. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राथमिक चर्चेनंतर उदयनराजे व महाजन यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेविषयी सातार्यासह संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे. मात्र, यावर दोघांनीही भाष्य केले नाही; राज्यव्यापी प्रचार दौर्यामध्ये उदयनराजे यांनी जोर लावावा, अशी गळ महाजनं यांनी घातल्याचे समजते. गिरीश महाजन यांना महाराष्ट्रात भाजपचे संकटमोचक म्हटले जात आहे. पक्षाला काही अडचणी आल्यास, त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी सध्या महाजन यांच्यावर सोपवली जात असल्याचे गेल्या काही महिन्यांमधील घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावरून महाजन हे थेट सातार्यात दाखल झाले. माढ्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने, महायुतीतील घटक पक्षांच्या फलटण व माळशिरस तालुक्यांमधील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्या नेत्यांशी समन्वय साधल्यानंतर महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न महाजन यांनी केल्याचे समजते. ही शिष्टाई किती यशस्वी झाली, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे
Lok Sabha Election 2024 | उदयनराजेंना उमेदवारी नसल्याचे कोण म्हणाले?
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा नाही. उदयनराजे यांचा लौकिक देशभर असून, त्यांना उमेदवारी मागण्याची गरज नाही. भाजपच त्यांना उमेदवारी देणार, असे महाजनं यांनी जलमंदिरातील बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाच्या तिसर्या यादीत उदयनराजेंचे नाव नक्कीच जाहीर होईल. महाराष्ट्रात भाजपच्या प्रचार यंत्रणेत उदयनराजे यांचा उपयोग कसा करून घेता येईल, याची चर्चा करण्यासाठी मी येथे आलो आहे; परंतु उदयनराजे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमे देत आहेत. येथे कोणताही तिढा नाही. महायुतीत तीन घटक पक्ष आहेत. सातारा व माढा येथे उमेदवारीवरून ताणाताणी सुरू आहे. उदयनराजे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे कोण म्हणाले, असा प्रश्न महाजन यांनी पत्रकारांना केला.