मुंबई – भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावरून जनतेला #PMCARES फंडात मदत जमा करण्याचे चॅलेंज दिले. सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले असून या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केंद्र व राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. देशातील जनता देखील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला आर्थिक मदत देताना दिसत आहे. अशातच गिरीज महाजन यांनी आज #PMCARES फंडाला स्वतः मदत करत इतरांनी देखील या संकटसमयी आपला खारीचा वाटा उचलावा असे सांगितले.
याबाबत आपल्या फेसबुक खात्यावर व्यक्त होताना त्यांनी, “माझा देश हीच माझी ओळख आहे व आज
माझ्या देशाला माझी गरज आहे. देशाच्या कोरोना विरूध्द लढतीत, मी माझा खारीचा वाटा समर्पित करीत आहे. आपणही #PMCARES फंडमध्ये आपला खारीचा वाटा समर्पित करून हे चॅलेंज स्विकारावे व आपल्या मित्र मैत्रिणींना नॅामिनेट करावे.” असा संदेश दिला आहे. आता महाजन यांचे चॅलेंज स्वीकारून राज्यातील जनता #PMCARES फंडामध्ये मदतीची रक्कम जमा करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.