सातवा वेतन आयोग लवकरच लागू होणार – महापौर
पुणे – करोना विरोधातील लढ्यात मागील सहा महिन्यांपासून अहोरात्र लढा देणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मंगळवार दिलासादायक दिवस ठरला. सुमारे 17 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय माजी सभागृहनेता आणि नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीने एकमताने घेतला. स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेनंतर या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह समितीतील सर्व पक्षीय सदस्य तसेच युनियनचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर 2016 पासून महापालिका युनियन सातत्याने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत होत्या. प्रशासनाने सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात तयार करून दिलेल्या प्रस्तावावर समितीने सातत्याने बैठका घेऊन, सर्व सदस्य तसेच युनियनचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची भूमिका ऐकून घेतली.
महापालिकेच्या सुमारे 17 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास दरवर्षी साधारण 500 कोटी रुपये आर्थिक भार वाढणार आहे. वेतन आयोगातील फरक हा पूर्वीप्रमाणेच टप्प्याटप्याने देण्याबाबत समितीच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे.
– श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, सातवा वेतन आयोग समिती