नवी दिल्ली – गुलाम नबी आझाद यांनी लवकरच नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असून त्याचे पहिले युनिट जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन केले जाईल असे म्हटले आहे. त्यावर कॉंग्रेसच्या जम्मू काश्मीर प्रभारी रजनी पाटील यांनी म्हटले आहे की, त्यांचा हा पक्ष म्हणजे भाजपचीच दुसरी टीम आहे.
राज्यसभेत आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी जे अश्रू ढाळले त्याचे मोल आझाद यांनी देणे अपेक्षितच होते. पाटील यांनी सांगितले की, त्या सोमवारपासून जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असून, केंद्रशासित प्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांची भेट घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
आझाद यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कॉंग्रेसवर काय परिणाम होईल, यावर पाटील म्हणाले की, त्याचा काय परिणाम होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. तथापि, पक्षाने त्यांना इतके काही दिल्यानंतर त्यांनी आज काय केले आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.