मुंबई – माझ्या मुलीने वडील गमावले म्हणून जितके दुःख मला आहे तितकेच वाईट मला अभिषेक घोसाळकर यांच्या मुलाविषयीही वाटत आहे, अशी भावना मॉरिसची पत्नी सरिना नोरोन्हाने व्यक्त केली आहे.
तसेच मॉरिसने जे काही केले त्याचा मला आयुष्यभरासाठी पश्चात्ताप असेल. मॉरिसने हे कृत्य केले आहे, यावर आमचा विश्वासच बसला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हाने ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या केली. मॉरिसने आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासह फेसबुक लाईव्ह करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली.
सरिना बोलतांना म्हणाल्या, मला प्रकर्षाने एक गोष्ट मॉरिसविषयी सांगायची असेल तर ती एकच आहे की, एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये की त्याचे परिणाम इतके वेदनादायी असतील. जी घटना घडली त्यासाठी मॉरिसचे शत्रूही जबाबदार आहेत.
मॉरिसवर दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारी केसेस राजकीय हेतूने प्रेरित होत्या. मॉरिसच्या शत्रूंनी षडयंत्र रचून त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवले होते. ही गोष्ट वगळली तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल नव्हता, असे त्यांनी सांगितले.
मॉरिस तुरुंगातून सुटल्यापासून दबावाखाली
मॉरिस तुरुंगातून सुटल्यापासून दबावाखाली होता. मॉरिसचे सामाजिक काम आणि बॅनर याबाबत अनेकांनी आक्षेप नोंदवले होते. त्याच्या शत्रूंनी अमेरिकन दूतावासाकडे त्याच्याबाबत पत्रे पाठवली होती.
मॉरिस हा गुन्हेगार असल्याचे लिहिले होते. परिणामी अमेरिकन दूतावासाकडून मॉरिसला समन्स पाठवण्यात आले होते. मॉरिसला जामीन मिळाल्यानंतर त्याला अमेरिकेला जायचे होते.
मात्र, तुझ्यावरील गुन्हेगारी प्रकरणे निकाली निघाल्याशिवाय तुला अमेरिकेला जाता येणार नाही, असे दूतावासाकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.