आज घटस्थापना

करोना प्रादुर्भावामुळे कार्यक्रमांना बंदी; मंडळांचा उत्साह घटला

पिंपरी – शहरामध्ये शनिवारी (दि. 17) देवीच्या मंदिरांमध्ये आणि घरोघरी विधीवत घटस्थापना केली जाणार आहे. शहरातील विविध मंडळांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे कार्यक्रम घेतले जातात. मात्र, अद्यापही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एकत्र येण्यावर निर्बंध कायम आहेत. त्याशिवाय, रास-गरबाचे कार्यक्रम न घेण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे काही मोजक्‍याच मंडळांनी देवीच्या मूर्ती बसविल्या आहेत.

शहरामध्ये दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा केला जातो. विविध मंडळांकडून नवरात्रोत्सवानिमित्त रास गरबा, दांडिया नृत्याचे कार्यक्रम घेण्यात येतात. त्याच्या विशेष स्पर्धाही घेतल्या जातात. त्याशिवाय, नवरात्राच्या प्रत्येक दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावर देखील मंडळांचा भर असतो. देवीची मूर्ती बसवून विधीवत घटस्थापना आणि नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवीचा गोंधळ, जागर होतो. करोना प्रादुर्भावामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत.

शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये शनिवारी विधिवत घटस्थापना होईल. मात्र, भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश नसेल. देवीची पूजा, अभिषेक, आरती, होमहवन आदी विधी साधेपणाने काही मोजक्‍याच व्यक्तींच्या उपस्थितीत केले जाणार आहेत. धार्मिक कार्यक्रमांसाठी एकत्रित जमण्यावर बंधने असल्याने देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात नित्य पूजा, आरती आदी प्रमुख कार्यक्रमच होणार आहेत. शहरातील काही मोजक्‍या मंडळांनी देवीची मूर्ती बसविली आहे.

घरोघरी घटस्थापना
घरोघरी करण्यात येणाऱ्या विधीवत घटस्थापनेसाठी आज आदल्या दिवशी शुक्रवारी शहरातील बाजारपेठांमध्ये पूजा साहित्याची खरेदी करताना नागरिक दिसत होते. हळद, कुंकू, नागलीची पाने, 5 फळ, अष्टगंध, गुलाल, करंडा, फणी, खारीक-खोबरं, गोमूत्र, धान्य, कापूर, लाल कापड, काळी माती, परडी, घट, धुप, पत्रावळी, देवीची पूजा आणि हवन विधीची माहिती दुणारी पुस्तिका, अत्तर, चुनरी, वाती, देवीचा फोटो आदी साहित्याची खरेदी सुरू होती.

घटस्थापनेसाठी आवश्‍यक पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी दरवर्षीच्या तुलनेत यंदा नागरिकांचा उत्साह बराच कमी आहे. करोनाच्या प्रादुर्भावाचा पूजा साहित्य विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला आहे.
– गणेश शिंदे, विक्रेते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.