कोलकाता – भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, केवळ क्रिज्ञकेट जगतच नव्हे तर जागतिक क्रीडापटू तसेच चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केल्या आहेत.
गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले व लगेचच ऍन्जिओप्लास्टीही करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचवेळी त्यांची करोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आल्याचेही सांगण्यात आले आहे. दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक गांगुली यांना छातीत दुखू लागले व अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले व लगेचच ऍन्जिओप्लास्टीही करण्यात आली.
पंतप्रपधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटपटू तसेच क्रीडापटूंनी गांगुली यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व ते लवकर बरे होऊन घरी परतावे यासाठी प्रार्थना केल्या आहेत. गेट वेल सून, दादा अशा शब्दात सोशल मीडियावर संदेश व्हायरल होत आहेत.