पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. एकूण 9 किलोमीटर लांबी असलेल्या बोगद्याचे आतापर्यंत दोन किलोमीटर लांबीपर्यंत खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे- मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासात 25 मिनिटांची बचत होणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मागील महिन्यात या प्रकल्पाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. महामार्गामुळे पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहर जवळ आली आहे. दोन्ही शहरातील अंतर हे तीन ते साडेतीन तासवर आले आहे.
दरम्यान, या मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्याबरोबरच दोन्ही शहरातील अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहेत. पावसाळ्यात या मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते.
या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या मिसींग लिंकचे एमएसआरडीने हाती घेतले आहे. तीन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.