वॉशिंग्टन – ओमायक्रॉन हा कोविडचा नवीन विषाणू आता जगातील अन्य देशांमध्येही पसरू लागल्याने त्याचा सर्वाधिक धोका अशिया-पॅसिफीक देशांना आहे. त्या प्रदेशांतील देशांनी आता या नवीन आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तयार राहावे आणि त्यासाठीची आपली वैद्यकीय सिद्धता सज्ज ठेवावी असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
या विषाणुची मोठी बाधा झालेल्या देशांमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा समावेश झाला असून त्या देशाने या विषाणुने कम्युनिटी ट्रान्समिशन स्तरावर संक्रमण केले आहे. अशियातील भारत, जपान, मलेशिया, सिंगापुर आणि दक्षिण कोरिया या देशांमध्येही हा विषाणु संक्रमित होऊ लागला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक ताकेशी कसाई यांनी सांगितले की संबंधीत देशांनी केवळ आपल्या सीमा बंद करून काही उपयोग नाही. असे करण्याने केवळ ओमायक्रॉनच्या प्रसाराला काही विलंब होऊ शकेल एवढेच, पण त्याचा प्रसार त्यातून पुर्णपणे रोखता येणे शक्य नाही असे त्यांनी नमूद केले.
आज याच्या प्रादुर्भावाचा कसा मुकाबला करायचा यावर आता संबंधीत देशांनी लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी आता पुरेशी वैद्यकीय सिद्धता ठेवण्याला पर्याय नाही असेही त्यांनी नमूद केले. अशिया विभागात इंडोनेशीयाला याचा सर्वाधिक धोका आहे कारण त्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ 35 टक्के लोकांनीच लसीकरण केले आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
ऑस्ट्रेलियाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की हा विषाणू आता संपुर्ण जगात संक्रमित होणार हे अटळ आहे. पण त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब अशी की हा विषाणू डेल्टा विषाणुपेक्षा अधिक घातक असल्याचे अजून तरी दिसून आलेले नाही. दरम्यान जगभरातील अनेक देशांनी आता आपल्या विमान सेवांवर निर्बंध लागू केले असून अमेरिकेनेही विदेशातून येणाऱ्या नागरीकांना एक दिवस आधी चाचणी घेणे बंधनकारक केले आहे.