नवी दिल्ली – भारतात युनिक आयडेंटिफीकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाने नागरीकांच्या डिजीटल आयडेंटीसाठी जी आधार कार्ड पद्धत आणली आहे ती पद्धत आता जागतिक स्तवरावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युआयडीएआयने त्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि विदेशातील अनेक देशांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात आधार कार्डची संकल्पना आली होती. त्यावेळी आधार कार्डवरून सरकारवर अनेक टीका झाल्या होत्या. मात्र आता तिच आधार कार्ड पद्धत जागतीक पातळीवर जाण्यास सज्ज झाली आहे.
युआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी सांगितले की, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याशीही आमची चर्चा झाली असून त्या विषयीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आला आहे. आधार कार्डाची डिजीटल आयडेंटिटी पद्धत अन्य देशांतही लागू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी त्या देशांशी सहकार्याचे करार केले जाणार आहेत असे ते म्हणाले.
भारतात आता 99.5 टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे. जागतिक बॅंक आणि संयुक्तराष्ट्रांमध्येही ही पद्धत लागू केली जाणार असून त्यासंबंधातही आमची चर्चा सुरू आहे असे गर्ग यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधारच्या सिस्टीममध्ये आता अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता आणली जात आहे असेही ते म्हणाले. आधार सिस्टीमचा सर्वाधिक लाभ पेटीएम आणि पेटीएम बॅंकेला झाला आहे असे ते म्हणाले.