नगर -नगरच्या पाच रोटरी क्लब एकत्र येत कोविड उपचार सेंटर सुरु करून, या संकट काळात मानवतेचे मंदिर उभारण्याचे मोलाचे काम केले आहे. नेतृत्व खंबीर असेलतर कितीही मोठा प्रकल्प सहजासहजी उभारता येतो. हे भव्य उपचार सेंटर याचे चांगले उदाहरण ठरेल. रोटरीच्या कोविड उपचार सेंटर मधून चांगले उपचार व चांगली सेवा मिळणार असल्याने येथून नक्कीच करोनाबाधितांना नवी सकारात्मक उर्जा मिळेल, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल हरिष मोटवाणी यांनी केले.
नगर मध्ये सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मेन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी या पाच रोटरी क्लबने एकत्र येत महानगरपालिकेच्या सहकार्यातून आनंदधाम रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात 120 बेडचे मोफत रोटरी कोविड केअर सेंटर सुरु केले आहे.
या सेंटरचे लोकार्पण रोटरी क्लबचे प्रांतपाल हरिष मोटवाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, अमी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, शासकीय तंत्रनिकेतचे प्राचार्य सातारकर, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे, सचिव दिगंबर रोकडे, प्रसन्ना खाजगीवाले, ईश्वर अशोक बोरा, ऍड.अमित बोरकर, पुरुषोत्तम जाधव, अध्यक्षा गिता गिल्डा, देविका रेले, रफीक मुन्शी, सुयोग झंवर, शिरीष रायते, प्रमोद पारीख उपस्थित होते.
या उपक्रमास सहकार्य करणारे जैन ओसवाल युवक संघ, इनरव्हिल क्लब ऑफ नगर विनसच्या अध्यक्षा योगिता मुथा, सचिव भाविका चंदे, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे प्रतिक बोगावत, संभव काठेड,मनिष सोनग्रा, विजेता क्रिकेट क्लबचे हर्ष बोरा, विनीत बोरा, नरेंद्र फिरोदिया यांनी रोटरियन्सच्या या कार्यासाठी मोलाची मदत केली. याठिकाणी आरोग्यधिकारी डॉ. सतीश राजूरकर व डॉक्टर सर्व रुग्णांवर उपचार करणार असून सर्व वैद्यकीय सुविधा, नर्सिंग सेवा ही सगळी व्यवस्था महानगरपालिका करणार आहे.