Vinayak Raut – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी 24 ऑक्टोबरला राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. यामुळे कोकणातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.
पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्यानंतर निलेश राणेंनी आपली निवृत्ती मागे घेतली. यातच आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut ) यांनी निलेश राणेंना टारगेट केले आहे.
निलेश राणेंनी राजकीय निवृत्ती घेण्याची भाषा करू नये, त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावे. मग, पराभव काय असतो, ते दाखवतो, असे थेट आव्हानच त्यांनी निलेश राणेंना दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राऊत म्हणाले, राजकीय नाटक कसे करायचे, हे राणे कुटुंबाकडून शिकूव घ्यावे. एकीकडे नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारले आहे. दुसरीकडे नितेश राणेंनी निलेश राणेंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोकण दौऱ्यात आले असताना निलेश राणेंना कुठे स्थान मिळाले, हे सर्व लोकांनी पाहिले आहे. फडणवीसांनी सांगितल्यामुळे निलेश राणेंनी वळवळ चालू केली आहे.
पण, ही फार दिवस चालणार नाही. त्यामुळे, निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये, निवडणूकीच्या रिंगणात पराभूत करून आम्हीच त्यांना नारळ देऊ, असे आव्हान राऊतांनी दिले.