गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपी गजाआड

पिंपरी – मोक्का, दरोडा, दरोड्याची तयारी व खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला सराईत आरोपी अखेर जेरबंद झाला आहे. पोलीस रेकॉर्डवरील आरोपी बंदर उर्फ दीपक सावंत कित्येक दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने त्याला मंगळवार (दि. 21) बेड्या ठोकल्या. बंदर उर्फ दीपक राजू सावंत (वय 22, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत बंदर पोलिसांना हवा होता. फरार असलेला बंदर सांगवी येथील सृष्टी चौकात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक निशांत काळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बंदर याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईनंतर त्याच्यावरील तळेगाव पोलीस ठाण्यात एक, हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, गणेश हजारे, उमेश पुलगम, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, किरण खेडकर, नितीन खेसे, सुधीर डोळस यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.