वाई, सातारा विधानसभा मतदारसंघ देणार अंतिम निकाल

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा तब्बल 11 लाख मतदान झाले आहे. मंगळवारी होणारी मतमोजणी फेरीनुसार आहे. मोजणीमध्ये सर्वात कमी फेऱ्या कराड दक्षिणमध्ये तर सर्वाधिक सातारा आणि वाई विधानसभा मतदारसंघात आहेत. यंदाच्या निवडणुकीत लढत आणि मतदान चुरशीने झाले आहे. त्यामुळे निकाल अंतिम फेरीपर्यंत ताणला जाण्याची शक्‍यता अधिक आहे. अशावेळी अंतिम निकाल जाहीर होताना सातारा व वाई मतदारसंघातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

अशी होणार मतमोजणी औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळ गोदाम येथे सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय सहा आणि पोस्टल व ईटीबीपीएस मतांच्या मोजणीसाठी एक असे एकूण सात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. सुरुवातीला पोस्टल आणि ईटीबीपीएस मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. ईटीबीपीएस मते स्क्रिनिंगद्वारे मोजण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला अधिक वेळ लागण्याची शक्‍यता गृहीत धरून सोबत ईव्हीएम मशिनची मते मोजणीस सुरुवात होणार आहे.

ईव्हीएम मशिनच्या मतांची मोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय एकाच वेळी एकूण 120 टेबलवर होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी या निवडणुकीत प्रत्येकी 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर 30 प्रमाणे एकूण 360 अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. फेरीनिहाय उमेदवारांना प्राप्त मतांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करणार आहेत. त्याचबरोबर परिसरात उभारण्यात आलेल्या पत्रकार कक्षाला प्राप्त मतांची एक प्रत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देखील फेरीनिहाय प्राप्त मतांची तात्काळ नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना माध्यमे व संकेतस्थळाच्या माध्यमातून प्राप्त मतांची संख्या समजणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×